प्रतिनिधी , सोलापूर : पुण्यातुन सात वर्षापूर्वी गायब झाल्यानंतर पाकिस्तानात पोहोचलेले सत्यवान भोंग आपल्या गावी लऊळ येथील घरी परतले आहेत. इतकी वर्ष मुलाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्याची चिंता सतावणाऱ्या ९० वर्षीय आई केसरबाई भोंग यांना मुलगा सत्यवान आल्याचे कळताच त्या गहिवरल्या. मायेने गोंजारत ए सत्यवान कुठं गेलतास, सात वरीस? काय खाल्लंस? कुठं राहीलास रं पोरा? अशी चौकशी करताना वृध्दापकाळाने अंधत्व आलेल्या केसरबाई गहिवरल्या होत्या.
त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते.सत्यवान घरी पोहचल्याने आई,भाऊ,पुतण्यासह अन्य नातेवाईक आनंदून गेले.लऊळ गावच्या हद्दीत श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास असलेले सत्यवान हे पत्नी समवेत २०१३ मध्ये पुण्याच्या दवाखान्यात गेले असता ते तेथून हरवले गेले होते. त्यानंतर ते पाकिस्तानात सापडल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तान प्रशासनाने भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधून पासपोर्ट काढल्यानंतर त्यांना भारतात पाठवले होते. मात्र, सत्यवानला काहीच आठवत नसल्याने तो पाकिस्तानमध्ये कसा पोहचला हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
