जनतेज न्युज

जॉब सोडून युवकाने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती, हिंगोली जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी

प्रतिनिधी , हिंगोली : महाबळेश्वरच्या प्रसिद्ध स्ट्रॉबेरीचे हिंगोली जिल्ह्यात प्रथमच एका युवकाने यशस्वीरित्या उत्पन्न घेतले आहे. पदवीचे शिक्षण घेतलेल्या या युवकाने जॉब सोडून आपल्या शेतीत लक्ष घातले आणि पहिल्याच प्रयत्नात स्ट्रॉबेरीच्या पिकामधून चांगला नफा देखील कमावला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना येथील नितीन प्रभाकर नायक असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
नितीनच्या कुटुंबीयांकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. नितीन हा पूर्वी मार्केटिंगचा जॉब करायचा. तीन वर्षांपूर्वी नितीन मित्रांसोबत दुर्गभ्रमंती साठी गेला असता महाबळेश्वर परिसरात पिकणारी स्ट्रॉबेरी पाहून हे पिक आपल्या शेतातही हे पिकवायचे अशी नितिनची इच्छा झाली. महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांकडून इत्यंभूत माहिती घेऊन, त्याने यावर्षी स्ट्रॉबेरीची रोपे आणली. महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी पिकासाठी असणारे पोषक वातावरण हिंगोली जिल्ह्यांमध्ये मिळेल की नाही, याची देखील शाश्वती नव्हती. तरीसुद्धा हा प्रयोग एक वेळ करायचा हा निश्चय नितीनने केला. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात, ते नितीनच्या बाबतीत लागू झाले. सुरुवात म्हणून नितीनने अवघ्या दीड गुंठा वर स्ट्रॉबेरीच्या रोपट्यांची लागवड केली. शास्त्रीय दृष्ट्या माहिती नसताना देखील नितिनने स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आता नितीन चांगल्या प्रकारे रसाळ स्ट्रॉबेरीचे उत्पादन देखील घेत आहे. परिसरातील अनेक लोक नितीन कडून स्ट्रॉबेरी खरेदी करत आहेत. तसेच नितीन स्वतः देखील बाहेर जाऊन विक्री करत आहे.
आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत, पारंपारिक पिके घेतो. परंतु नितिनने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा चंग बांधला, आणि मी देखील त्याला साथ दिली नितीनने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला याबद्दल नितीनचे वडील प्रभाकर नायक नितीन वरील शेती करण्याबद्दल विश्‍वास वाढला आहे असे सांगतात. अवघ्या दीड गुंठे स्ट्रॉबेरीच्या पिकातून नितिनने लागवड खर्च जाता आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. सवना परिसरात जिल्ह्यात नितीनच्या या शेतीचे कौतुक होत आहे. शेती असणाऱ्या युवकांनी जर नोकरी लागत नसेल तर शेतीमध्ये, कष्ट व नवीन प्रयोग केले तर यश हमखास मिळते. असे युवा शेतकरी नितीन आत्मविश्वासाने सांगत आहे.