जनतेज न्युज

बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात भाजपची मूक निदर्शने

प्रतिनिधी , पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्याचा विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षीय बालिकेवर वीस वर्षाचा तरुणाने बलात्कार केला होता. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकात आज मूक निदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, गृहमंत्र्यांचा पोलिस प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पुणे शहरात महिला अत्याचारात वाढ होत आहे, गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायात वाढ झाली आहे. असे असताना महा विकास आघाडी सरकारचे अशा घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. गंभीर गुन्ह्याचा घटनांमध्येही कारवाई करण्यात पोलिसांना वेळ नाही. गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यातील पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बसतात आणि शायनिंग मारतात.. परंतु कबीर घटकांकडे लक्ष देत नाहीत.. आगामी काळात शहरात होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवला नाही तर भारतीय जनता पक्ष अधिक आक्रमकपणे आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला..