लसीकरणासाठी सध्या 4 खाजगी रूग्णालयांना मान्यता..
दोन डोससाठी खाजगी रूग्णालयात 500 रूपये आकारणी…
प्रतिनिधी , बुलडाणा : कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. पहिल्या दोन फळीतील लसीकरणानंतर तिसऱ्या फळीतील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त व्यक्तीना लस देण्यात येणार आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी या फळीतील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ सावके उपस्थित होते.
पहिल्या दोन फळीतील लसीकरणानंतर तिसऱ्या फळीतील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त व्यक्तीना लस देण्यात येणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविन ॲपच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्राच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी सुरू राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या संदेशामध्ये लसीकरण सत्राचे ठिकाण, दिनांक व वेळ याची माहिती देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 13 शासकीय रूग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील शासकीय रूग्णालय आहे. या ठिकाणी विनामूल्य लसीकरण करण्यात येणार आहे. तर अमृत हृदयालय व मेहेत्रे हॉस्पीटल बुलडाणा, कोलते हॉस्पीटल मलकापूर व कोठारी हॉस्पीटल चिखली या चार खाजगी रूग्णालयांमध्ये दोन डोससाठी 500 रूपये आकारण्यात येणार आहे. भविष्यात आणखी हॉस्पीटल यामध्ये जोडण्यात येणार आहे. एक डोस 250 रूपयांना मिळणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणीसुद्धा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका लसीकरण केंद्राला 100 व्यक्तींचे दैनंदिन उद्दिष्ट असणार आहे. त्याचप्रमाणे 45 ते 60 वर्षादरम्यान असलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींनासुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 3615 बेड कोविड रूग्णांसाठी उपलब्ध आहे.खाजगी रूग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असताना शासनाने निर्धारीत केलेल्या दरापेक्षा अधिकचा दर घेतल्याचे समोर आल्यास किंवा तशी तक्रार आल्यास संबंधीत रूग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी 250 रूपये प्रतिडोस दर द्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले…
