प्रतिनिधी , मुंबई : मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात फोन कॉल्स झाले होते. याबाबतचा सीडीआर (CDR) रीपोर्ट माझ्याजवळ आहे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, आता त्यांच्या सीडीआर रीपोर्ट माझ्याजवळ आहे या विधानाने ते अडचणीत येऊ शकतात. कारण सीडीआर रीपोर्ट मिळवणं हा गुन्हा आहे. हाच धागा पकडत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसंच, फडणवीस यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सीडीआरची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी, असं आवाहन देखील केलं आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने जे सीडीआर रॅकेट उघडकीस आणलं होतं, याचा संदर्भ देत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
“सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR रॅकेट उघडकीस आणले होते. नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे.,” असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे
