जनतेज न्युज

मुंबईत खरंच लॉकडाऊन सुरू आहे का? ठाकरे सरकारनं ‘हे’ फोटो पाहून उत्तर द्यावं

प्रतिनिधी , मुंबई : भारतात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. कोरोनाविरुद्धची लढाई हे असे युद्ध आहे जे घरातच राहून जिंकता येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई हे सर्वाधिक कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे इथे या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. मात्र, आज सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावजवळ आणि ऐरोली टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. २० एप्रिलपासून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन काहीसा शिथिल करण्यात आला. परंतु, त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येत नाही. असं असतानाही, एवढे लोक का, कसे घराबाहेर पडले आणि त्यांना स्थानिक प्रशासन-यंत्रणा रोखू कशा शकल्या नाहीत, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आज सकाळी मुंबई हायवेवर दिसलेलं चित्र काळजाचे ठोके वाढवणारे आहे.
कोणत्या भागांना लॉकडाऊनच्या नियमावलीतून सवलत देण्यात आलीय, याची नेमकी माहिती न पोहचल्यानं एवढे लोक बाहेर पडले का? ते नेमके कोण होते? त्यांना पोलिसांनी रोखलं का? माघारी पाठवलं का? हे लोक कुठे गेले? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? या प्रश्नांची उत्तरं शोधणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या निर्देशांकानुसार इंधन विक्री आणि वाहतूक, ५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधी सेवा, कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स या गोष्टी ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरदार मंडळी बाहेर पडली असावीत, अशी शक्यता आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि पालघर या जिल्ह्यांत कोरोना हॉटस्पॉट आहेत. तर, हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांत अकोला, लातूर, सातारा, रत्नागिरी उस्मामानाबाद, जळगाव, सिंधुदुर्ग, रायगड, बीड, हिंगोली, जालना, वाशिम, धुळे, सोलापूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे कोरोना हॉटस्पॉट नसले तरी एखाद दुसरे अथवा तुरळक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त ज्या जिल्ह्यात अजिबातच कोरोनाचे रुग्ण आढळून आले नाहीत त्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.