प्रतिनिधी , रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवळ 28 वर्षीय वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. काल रात्री दीपाली चव्हाण यांनी हरिसाल येथे स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही आत्महत्या आहे की खून याचाही तपास लागला पाहिजे. दीपाली चव्हाण यांना DCF शिवकुमार टोकाचा त्रास देत होते, यासारख्या अनेक लेखी तक्रारी त्यांनी वारंवार केल्या होत्या. मात्र, वनसरंक्षक रेड्डी यांनी दखल घेतली नाही. भ्रष्ट वन अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दीपाली चव्हाण या महिलेचा बळी गेला. या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
