जनतेज न्युज

लग्न समारंभातून चोरून नेलेले 42 तोळे सोने पोलिसांनी केले हस्तगत.

प्रतिनिधि , ठाणे : कासारवडवली पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घोडबंदर रोडवर जलसा लॉनमध्ये श्रीमती अनिता ओमवीर सिंग यांचा मुलगा सचिन यांचा लग्न समारंभ चालू होता, लग्न समारंभात फोटो काढत असताना अनिता सिंग यांची खुर्चीवर ठेवलेली सोन्याची बॅग काही क्षणात चोरीला गेली, त्या बॅगेत 42 तोळे सोन्याचे दागिने होते, त्यानंतर दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी कासारवडवली पोलीस स्टेशनला दिली.

ही चोरीची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त विनायकुमार रोठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे व त्यांच्या पथकाने ह्या गुन्ह्याचा तपास सुरु केला, ह्या गुन्ह्याचा अहोरात्र तपास केल्यानंतर हा गुन्हा मध्यप्रदेश येथील राजगड जिल्ह्यातील पचोर येथील बबलू सुमेरसिंग सिसोदिया व त्याच्या दोन साथीदाराने केल्याचे समजले.हे आरोपी बाहेरच्या राज्यातले असतानाही पोलिसांनी त्यांचा थांगपत्ता शोधून काढला, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे व त्यांचे पथक राजगढ जिल्यातील गुलखोडी या ठिकाणी चोरांना पकडण्यासाठी आठ दिवसापासून तळ ठोकून होते, परंतु आरोपींना याचा सुगावा लागल्यामुळे ते पळून गेले पण चोरीला गेलेले सगळे दागिने बबलूच्या घरी मिळाले आणि पोलिसांनी ते हस्तगत केले.

मध्यप्रदेश येथील राजगढ जिल्ह्यामध्ये बबलू सिसोदीया सारखे बरेच जण चोरीचीच काम करतात, पूर्ण राज्यामध्ये हे लोक पसरलेले आहेत, लग्नसमारंभातून सोन्याचे दागिने चोरण्याचे काम ते करतात, त्यासाठी ते प्रामुख्याने लहान मुलांचा वापर करतात, दोन ते तीन लहान मुलांना ते लग्न समारंभात सोडून देतात, ह्यातील मोठी व्यक्ती लांबून त्यांचावर पाळत ठेऊन असते, लग्न समारंभ म्हणजे वऱ्हाडाची सगळी धावपळ सुरु असते, मुलाकडून कुठले पाहुणे आहेत आणि मुलीकडून कुठले आहेत याची दोघांना सुद्धा माहिती नसते, या गोष्टीचा फायदा घेऊन हे चोर लहान मुलांना तिथे पाठवतात. मुलाच्या किंवा मुलीच्या कुठल्या नातेवाईकांच्या बॅगेमध्ये दागिने आहेत हे ते बरोबर हेरतात, ही लहान मुलं सतत त्यांच्या मागे असतात. ज्या कुठल्या क्षणाला ती व्यक्ती बॅग खाली ठेवते त्याच वेळेला ती मुलं ही बॅग पळवतात. त्यानंतर पुढे ही सोन्याची बॅग परराज्यात पाठवली जाते व त्यातील सोन्याची व्हिलेवाट लावली जाते, ह्या चोरांना पकडणे म्हणजे फार कठीण काम आहे, तरी मोठ्या सीताफिने ठाणे पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले, यावेळी श्रीमती अनिता सिंग यांनी संपूर्ण दागिने परत मिळवल्यामुळे कासारवडवली पोलिसांचे विशेष आभार मानले.