जनतेज न्युज

शस्त्रक्रियेबाबत केंद्राने दिलेल्या निणयाच्या समर्थनार्थ ‘नीमा’सह आयुर्वेदिक डॉक्टर संघटनांचा पुढाकार.

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : केंद्र सरकारने आयुष डॉक्टरांना बहाल केलेल्या शस्त्रक्रियेच्या निर्णयाचे ‘नीमा'(नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन) संघटनेसह आयुर्वेदिक व्यासपीठच्या डॉक्टरांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि आयएमए डॉक्टरांच्या भूमिकेला विरोध दर्शवण्यासाठी ‘नीमा’सह आयुर्वेदिक डॉक्टरांनी आज पिंक रिबीन लावून काम केले . नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठच्या प्रतिनिधींनी यावेळी कल्याण तहसीलदार कार्यालयात सरकारच्या निर्णयाला समर्थन देणारे निवेदन सादर केले
केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) आयुर्वेदिक डॉक्टरांना 58 शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला इंडियन मेडीकल असोसिएशनने तीव्र विरोध दर्शवत आज देशव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. आयुर्वेदिक डॉक्टरांना अत्याधुनिक शस्त्रक्रियेचा सराव नसल्याने अशा व्यक्तींमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकतो असा दावा इंडियन मेडीकल असोसिएशनकडून करण्यात आला आहे. मात्र ‘नीमा’सह आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटनांनी आयएमएचे दावे फेटाळून लावले आहेत. ‘आयएमए’चा संप हा जनतेची दिशाभूल करणारा आणि केवळ सरकरवर दबाव आणण्यासाठी केला गेल्याची प्रतिक्रिया ‘नीमा’ संघटनेचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही पिंक रिबीन लावून काम केल्याचेही त्यांनी सांगितले.
तर कोवीड काळामध्ये आयुष डॉक्टरांनी उल्लेखनीय काम केले आहे. मात्र सरकारच्या निर्णयाला आयएमए विनाकारण विरोध करत आहे. त्यांना (आयएमए) विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात आयुष कृती समिती स्थापन झाली असूनन त्यामध्ये ‘नीमा’सह आयुर्वेद व्यासपीठ संघटनेचे सर्व डॉक्टर एकत्र आल्याची माहिती आयुर्वेद व्यासपीठ संघटनेच्या डॉ. अभिजित ठाकूर यांनी दिली.