प्रतिनिधी, मणिपूर : मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना गोळी लागून मृत्यूशी झुंज देणाऱ्या निलेश महाजन यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी प्राणज्योत मालवली, निलेश महाजन यांना वीरमरण प्राप्त झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच बुधवारी शासकीय इतमामात सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू येथील मूळचे रहिवासी असणारे आणि सध्या सोनगीर येथे वास्तव्यास असणाऱ्या शहीद जवान निलेश महाजन हे मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे ड्युटी बजावत असताना त्यांना गोळी लागली होती, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांच्यावर गुवाहटी येथे उपचार सुरू होते मात्र अखेर गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांची मृत्यूशी झुंज संपली असून ते शहीद झाले आहेत.
शाहिद जवान नीलेश महाजन यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र काही प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पार्थिव बुधवारी सोनगीर येथे येणार असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ बहीण असा परिवार असून सोनगीर गावात एकच शोककळा पसरली आहे. निलेश महाजन यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाच्या वतीने देखील काटेकोरपणे नियमांचे पालन करीत हे अंत्यसंस्कार पार पाडले जाणार आहेत.
