जनतेज न्युज

शेतकऱ्यांना कर्जाच्या शापातून मुक्त करणारी सुबाभूळाची शेती

जळगाव प्रतिनिधी
शेती करतांना पारंपरिक पिकांना लागणारा खर्च, मजुरांची वाढती टंचाई व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच वैतागला आहे. या बिकट संकटावर मात करण्यासाठी व बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी सुबाभुळ लागवड हा चांगला पर्याय ठरू पाहत आहे. लोहटार येथील शेतकऱ्यांने सुबाभूळ लागवड करून कर्जाच्या दुखावर फुंकर मारून आपल्या कर्जाच्या वेदनावर मात करून एक आदर्श निर्माण केला आहे. 
       पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त  विजय रामकृष्ण वाणी हे टेल्को कंपनीत इलेक्ट्रीक सुपरवायझर म्हणून नोकरीला होते. परंतु त्यांनी शेती करण्याच्या उद्देशाने नोकरीच सोडली.1974 पासुन ते शेती करित असुन वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून त्यात यशस्वी होत आहेत. त्यांच्या जवळ प्रथम 45 एकर शेती होती. परंतु शेतातुन चांगले उत्पन्न घेवुन त्यानी पुन्हा शेती विकत घेण्याचे सातत्य त्यांनी कायम राखले आहे. आज ते 100 एकर चे मालक आहे. त्यांनी ३० एकर शेत जमिनीवर सुबाभुळ लागवड केली आहे.यापैकी दर वर्षी 10 एकर क्षेञात कटिंग चे नियोजन केलेले आहे.त्यामुळे दर वर्षी 400 ते 500 टनाची कटिंग होत असल्याने दरवर्षी सुमारे 12 ते 15 लाखांचे उत्पन्न मिळत असते. तर उर्वरित क्षेञात केळी, लिंबु, हळद, कांदा, गहू, मोसंबी, मका, पपई, आदी पिकांची लागवड केली आहे. वाणी यांनी संपुर्ण १०० एकर शेतीवर टेलिफोन लाईन प्रमाणे पाईप लाईनचे जाळे पसरवुन १० विहीरी, ४ बोअरवेल व एक शेततळे अशा पाण्याच्या स्त्रोताचा परिपुर्ण उपयोग घेत आहे. सदरचे सुबाभुळचे लाकूड  हे सोनगड (गुजरात) येथील पेपर मिलला जात असुन त्यासंबंधीत कंपनीशी करार केला आहे. त्यानुसार पहिल्या कटिंगला ३ हजार ६००  रुपये टन या दराप्रमाणे करार केलेला आहे. तर दुसऱ्या कटिंग पासुन  चा माल हा ३ हजार २०० रुपये टन या दराप्रमाणे कंपनी खरेदी करत आहे. ३ हजार ६०० रुपये चा भाव पकडला तर त्यांना 4 हेक्टर क्षेत्रात 12 ते 15 लाखांचे  उत्पन्न  दर तीन वर्षानी 
अपेक्षित आहे. त्यामुळे कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यासमोर त्यांनी उत्तम उपाय उभा केला आहे. 

अशी केली सुबाभूळची लागवड….

प्रारंभी कंपनीकडुन २५० रुपये किलो दराप्रमाणे एकरी सुबाभुळचे बी दिले जाते. त्यानंतर शेत नांगरणी करुन तयार करणे व लागवड ही जुन महिन्यात करुन  ५ × २.५ (पाच बाय अडीच) या पद्धतीने लागवड केली. आजच्या घडीला हे पिक १६ महिन्यांचे झाले आहे. प्रत्येक झाडाच्या स्टम्पची जाडी ५ ते 7  इंचापर्यंत पोहोचले आहे. तर उंची तब्बल ३० ते ३५ फुटापर्यंत वाढली आहे. झाडे वाढली की झाडांच्या सावलीमुळे शेतात गवत उगवत नाही व कोणतीही प्रकारची कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरजच भासत नाही. शिवाय झाडांचा पाल पाचोळा व बारीक काड्या पडुन सेंद्रिय खत मिळत असेत.या शेती साठी  मजुरांची गरज भासत नाही. कारण तोडणी मजुर ही कंपनी मार्फत पुरविले जातात. त्याच सोबत थेट आपल्या शेतातुन कापलेले सुबाभुळचे लाकूड  ही कंपनीच्या माध्यमातून नेले जाते. म्हणुन  वाहतुकीचा खर्च ही आपल्याला येत नाही.  

असे आहे सुबाभुळ पिकाचे अर्थशास्त्र….

कंपनीशी ३ हजार ६०० रुपये टन या दराप्रमाणे करार केलेला आहे.सतत गेल्या तीन वर्षांपासुन महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती अशा परिस्थितीत सुध्दा कमीत कमी पाण्यातून नियोजन करून 4  हेक्टर क्षेत्रात 450 टन लाकूड चे उत्पन्न मिळवले आहे.  

चार  हेक्टर क्षेत्रात लगवड केल्यानंतर एका झाडाचे सरासरी वजन २० ते २५ किलो पकडले तर 450  टन लाकूड मिळु शकते व ३ हजार ६०० रुपये टन या दराप्रमाणे भावात 12 ते 15 लाखांचे  उत्पन्न दर तीन वर्षानी  अपेक्षित आहे. हेच उत्पन्न जर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते तर दिड पटीने उत्पन्नात वाढ झाली असती म्हणजे सरासरी 4  हेक्टर क्षेत्रात 600 ते 700 टन लाकूड चे उत्पन्न निघाले असते.हेच 3 हजार 600 रुपये टन या दराप्रमाणे भावात 18 ते 20 लाखांचे दर तीन वर्षानी उत्पन्न मिळवले जाऊ शकते.तसेच कापणी व वाहतूक खर्च हा कंपनीकडे असतो.