प्रतिनिधी , चांगले हस्ताक्षर हे नेहमीच चांगल्या स्वभावाचे द्योतक मानले जाते. त्यासाठी इतरांचेही हस्ताक्षर सुंदर व वळणदार व्हावे, यासाठी हिंगोलीतील एक अवलिया गेल्या 14 वर्षांपासून प्रयत्नरत आहे. हिंगोलीच्या गुगुळ पिंपरी येथील युवक पांडुरंग चोपडे यांनी इतरांचे हस्ताक्षर सुंदर बनविण्याचा विडा उचलला आहे. सुंदर हस्ताक्षर ही चळवळ समजून महाराष्ट्रातील पाच लाखाहून अधिक विद्यार्थी, हजारो अधिकारी, कर्मचारी विविध स्तरातील नागरिकांचे हस्ताक्षर त्यांनी सुंदर बनविले आहे. आज जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सर्वच हस्ताक्षर प्रेमी व हस्ताक्षर सुंदर बनविणाऱ्या ट्रेनर्सनी एक चळवळ म्हणून हे काम करावे, असे आवाहन पांडुरंग चोपडे यांनी केले आहे.
