प्रतिनिधी , कोल्हापूर : सैन्यात नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी विद्यापीठाच्या पहारेकऱ्यांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी पोवार ( रा.कासार पुतळे, ता.राधानगरी) व रोहित मारुती मुळीक (रा.भादवण, ता.आजरा) असे गुन्हा दाखल झालेल्या पहारेकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान याचा शोध राजारामपुरी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी भगवान फड (रा.मळगाव देवकरा, ता.अहमदपूर,लातूर) हे वारंवार कोल्हापुरात येत होते. त्यावेळी तानाजी पवार यांच्यासोबत यांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत सप्टेंबर 2019 पासून ते आजपर्यंत तानाजी पवार यांनी शिवाजी फड यांच्याकडे नोकरीच्या आमिषाने जवळपास 21 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यांचा मित्र रोहित मुळीक यांच्या मदतीने फिर्यादी व त्यांच्या सहकारी मित्राकडून सैन्यदलात कॉन्टॅक्ट मेंट बोर्ड येथे नोकरीस लावतो म्हणून त्याच्या सहकारी मित्रांकडून पैशाची मागणी केली. त्यावेळी नोकरीचे मूळ बनावट नियुक्तीपत्र, त्यावर भारतीय सेनेचा लोगो, सही असलेले शिक्का, तसेच बनावट आयडेंटी कार्ड त्यावर फोटो सही शिक्का असलेले देऊन फिर्यादी व सहकारी मित्रांची फसवणूक केली. फसवणुकीची बाब लक्षात येताच शिवाजी फड यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तानाजी कृष्णात पोवार हे शिवाजी विद्यापीठाचे पहारेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. अधिक तपास राजारामपुरी पोलिस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
