जनतेज न्युज

हवं तर पुणे आठ दिवस कडकडीत बंद ठेवा, मात्र रुग्णसंख्या कमी करा- अजित पवार

प्रतिनिधी , पुणे : पुण्यात कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. येथला कोरोना मृत्युदर हा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. पुण्यातील मृत्युदर पाहता आता शासनानेही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील मृत्युदर कमी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका आणि रुग्णालयांना केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल अजित पवारांनी पुण्यात आढावा बैठक घेतली होती. तुम्हाला काय हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्युदर कमी झाला पाहिजे. पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कडक धोरण अवलंबावे. त्यासाठी आठ दिवस कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.

यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील, असे त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल. ससून रुग्णालयाच्या नवीन ११ मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून २५ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये-जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले. रॅपीड टेस्टमार्फतदेखील संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. हॉटस्पॉट असणाऱ्या ग्रामीण भागातदेखील कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा. पोलिसांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनद्वारे तपासणीवर भर द्यावा.

तसेच पोलिसांना एन-९५ मास्क आणि आवश्यक ती साधने उपलब्ध करून द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावेत. यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांद्वारे धान्य वितरण सुयोग्य आणि सुनियोजित करण्यात यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना अजित पवार यांनी दिली. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्यासाठी मार्केट कमिट्या, सहकारी संस्थांनी पुढे यावे आणि अर्थसाहाय्य करावे.

शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्राचार्यांना संस्थेत उपस्थित राहण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे, अशी सूचना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. तसेच सेवा देणाऱ्या खाजगी रुग्णालयांना शासनाने मदत करावी, अशी सूचनाही राज्यमंत्र्यांनी बैठकीत केली असता निश्चितच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.