प्रतिनिधी , मुंबई : भारतात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील स्थिती ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे. उत्तर ते दक्षिण, राज्यकर्ते ते सेलिब्रिटी, सामान्य नागरिक ते शेतकरी; या सर्वच घटकातील लोक मुख्यमंत्री ठाकरेंच्या कार्याचे कौतुक करताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात, त्यातही मुंबईत करोनाबाधितांची संख्या अधिक असतानाही उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत त्याबद्दल विविध समाजमाध्यमांमार्फत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही उद्धव यांच्या या भूमिकेचे स्वागत केलं असून ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिस्थिती हाताळत आहेत त्याचा आम्हाला अभिमान तर आहेच पण त्यांच्या या नेतृत्वाचा आदारही आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही ट्विटरवरुन उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचं सांगत त्यांना सलाम केला आहे. “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने करोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.
