प्रतिनिधी, अमरावती : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणारी ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचा गाजावाजा शासन करते असे असले तरी मात्र रोजगार हमी योजना सध्या अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही अशा प्रकारे चर्चिली जात आहे.
या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या येवदा येथे चक्क मयत माणसाला जिवंत दाखवण्याचं काम पंचायत समिती अंतर्गत करण्यात आला आहे. विश्वनाथ देवमन भालतडक हे १० ऑक्टोबर २०१० रोजी मयत आहेत. परंतु ११ वर्षानंतरही मयत व्यक्ती रोजगार हमीच्या वही पुस्तिकेवर जिवंत झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. या मयत व्यक्तीच्या नावाने ७ दिवस काम केल्याची नोंद करण्यात आली असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. मयत व्यक्ती काम केल्याची नोंद झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.
