प्रतिनिधी , बीड : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात झालेली आहे. या आंदोलनाच्या सुरुवातीला पाठिंबा म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्य शासनाचे मंत्री असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी जालन्यामधील आंदोलनात गायकवाड आयोगावर आक्षेप घेतलेला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चा नंतर शासनाला जाग न आल्यामुळे, झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आम्ही पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. या आंदोलनाचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी मालेगावात माध्यमांशी बोलताना दिला आहे. या आंदोलनात लहान मुलींनी देखिल सहभाग नोंदवत, आमच्या भविष्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
