जनतेज न्युज

आयएमएचे आज रुग्णालय बंद आंदोलन; केंद्र सरकारच्या ‘मिक्सपॅथी’ धोरणाला विरोध.

प्रतिनिधी , यवतमाळ : केंद्र सरकारच्या मिस्कपॅथी धोरणाला कडाडून विरोध करीत आज आयएमए व आयडीएच्या वतीने सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत रुग्णालय बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.
आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील सीसीआयएमच्या अधिसूचने विरुद्घ आयएमएने राष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील 219 शाखांमधील 45 हजार डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये पंजीकृत असलेले एकूण एक लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी झाले आहे. केंद्रशासन व आयुष मंत्रालयप्रणीत सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. रुग्णांना आपण तज्ञ अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांकडून उपचार घेतो आहोत की सीसीआयएमचा हा कोर्स केलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हे न समजल्यामुळे गोंधळात पडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आयएमएचा लढा आयुर्वेदविरोधी नाही तर, मिक्सपॅथी विरोधात असल्याचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी, सचिव डॉ. प्रशांत कसारे यांनी स्पष्ट केले आहे.