जनतेज न्युज

कल्याण-डोंबिवलीत घर घेणार असाल तर सावधान, विकासकाकडून आपली होऊ शकते फसवणूक

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भूमाफिया  अनधिकृत इमारती उभारून नागरिकाची फसवणूक करत आहेत. तर या अनधिकृत इमारती अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याने रहिवाशाच्या जीवाशी खेळ होत असल्याने या अनधिकृत इमारतीवर हातोडा मारत या इमारती पूर्ण नष्ट करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने सुरु केली असून  आज एकाच दिवशी 4 इमारतीवर कारवाईचा बडगा उगारत असून महानगर पालिका परिसरात घर घेण्यापूर्वी महापालिकेकडे चौकशी करण्याचे आव्हान महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाचा धडाका सुरु असून पालिका अधिकार्याच्या वरदहस्तामुळे भूमाफिया जागा मिळेल तिथे इमारती उभारत आरक्षित भूखंड गिळंकृत करत नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. या अनधिकृत बांधकामामुळे मुलभूत सुविधांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले असून न्यायालयाने देखील या इमारतीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर पालिका आयुक्तांनी या  अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला असून आज मंगळवारी २४ मे रोजी पालिकेच्या ह प्रभागातील २, आय आणि ई प्रभागातील प्रत्येकी १ अश्या 4 अनधिकृत इमारतीवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी सर्व प्रभागात कारवाई सुरु करण्यापेक्षा  १०  प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना एकाच ठिकाणी नेमून कारवाई यशस्वी करता यावी यासाठी टप्याटपप्याने कारवाई सुरु करण्यात आली असून शहरातील सर्व १० प्रभागातील अनधिकृत इमारतीवर हातोडा मारला जाणार असून संबंधित विकासकावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करत  तोडक कारवाईचा  खर्च  विकासकाकडून वसूल करणार आहे . त्याच बरोबर अनधिकृत बांधकामामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत असल्याने महानगर पालिका परिसरात घर घेण्यापूर्वी महापालिकेकडे चौकशी करत अधिकृत इमारतीची माहिती मिळून घर घेण्याचे आव्हान महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे