राष्ट्रवादीचा शिवसेनेला टोला ??
चक्क सेनेच्या आमदारांसमोरच केले वक्तव्य…
प्रतिनिधि , कल्याण : गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे काल कल्याण पश्चिममध्ये एका क्रिकेटच्या सामन्याला आले होते. यावेळी त्यांनी कल्याणमधील रस्त्यांबाबत चिंता व्यक्त केली. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, तरुणांनी काही तरी विचार केला पाहीजे असे सांगितले. यासोबतच अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे वक्तव्य करीत त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांवर थेट प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेकवर्षे शिवसेना व भाजपाची सत्ता आहे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्याने शिवसेनेला कानपिचक्या दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली बाबत अस्वच्छ शहर म्हणून वक्तव्य केले होते आणि भाजपाला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने शिवसेनेला रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन कानपिचक्या मारल्याने आव्हाडांनीही सेनेला घरचा आहेरच दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुक असल्याने रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे. अंबरनाथमध्ये काही महिन्यांपूर्वी आव्हाड यांनी महाविकास आघाडीविषयीच बोलताना येणाऱ्या काळात काय होईल हे सांगता येत नाही. परंतू आता तरी ते आपले मित्र असल्याने त्यांच्यावर टिका करता येत नाही. परंतू येणारा काळ अवघड असून युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी कायम ठेवा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. अंबरनाथ येथे सेनेची सत्ता आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्येही सेनेची सत्ता आहे, त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल का ? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
