प्रतिनिधि , हिंगोली : वसमत तालुक्यातील गुंज येथील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावर ड्युटी करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्यास गावातील कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याची घटना 15 जानेवारी रोजी घडली.
वसमत तालुक्यातील गुंज येथे पोलीस कर्मचारी गजानन मारोती पुरी हे निवडणूक बंदोबस्त करत असताना गावातील शिवहार नरवाडे यांनी पुरी यांच्यासोबत वाद घातला. यावेळी पुरी यांनी मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर जाण्याचे सांगून देखील ते गेले नाहीत. बूथ ताब्यात घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांना कट रचून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी गजानन पुरी यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिवहार नरवाडे, दत्ता नरवाडे, विश्वनाथ नरवाडे, काशिनाथ नरवाडे, मनमत नरवाडे व इतर दहा ते बारा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा करून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
