जनतेज न्युज

कळंबा कारागृहातील कैद्याला चेंडू तून गांजा पुरवणाऱ्या पुण्याच्या तिघांना अटक

प्रतिनिधी , कोल्हापूर – कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना संरक्षक भिंतीवरुन चेंडू टाकून गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील संरक्षक भिंती नजीक ही घटना घडली असून यामध्ये वैभव विवेक कोठारी, संदेश नितीन देशमुख, अमित सुनिल पायगुडे या तिघांना कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही पुणे शहरातील बिबेवाडी, के. पी. नगर याठिकाणचे रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेल्या या तिघांचा मित्र पुण्यातील गुंड शेख नामक संशयित आरोपी कळंबा कारागृहात कच्चा कैदी म्हणून शिक्षा भोगत आहे. त्याला गांजा पुरवण्यासाठी या तिघांनी टेनिस चेंडू कापून त्यात प्रत्येकी 5 ते 10 ग्रॅम गांजा भरून संरक्षक भिंतीवरून आत फेकण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे. कडेकोट बंदोबस्तात कळंबा कारागृहात बॉलच्या माध्यमातून गांजा पुरवण्याचा हा नवीनच प्रकार उघड केल्यामुळे कारागृह प्रशासन देखील आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. दरम्यान, या तिघा आरोपींना आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.