प्रतिनिधी , नवी मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने संतापलेल्या मराठा तरुणांनी सरकार विरोधात यलगार पुकारले आहे. त्याचा भाग म्हणून मराठा जोडो अभियान सुरू आहे. त्यानुसार आज तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई , कळवा ते नेरूळ अशी अभियान यात्रा काढण्यात आली.
रविवारी दुपारी कळवा नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समन्वयक वीरेंद्र पवार, रमेश आंब्रे, संतोष पालांडे, सुधाकर पतंगराव, प्रवीण उतेकर आदींनी पुष्पहार अर्पण केले. कळवा, ठाणे,.दिवा, विटावा.येथील मराठे कोरोनाचे सर्व नियम पाळून एकत्र जमा झाले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आरक्षण आपल्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचा , जय भवानी जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय, जय भवानी, जय शिवराय अशा घोषणा देत सर्व मराठा समाजाला जागे राहून आपल्या हक्कासाठी लढा देण्यास सज्ज राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी केले. यावेळी मराठ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.
