जनतेज न्युज

कुपोषणग्रस्त मुलांचे खजूर, काळजी संच धूळ खात, शेकडो माता, लहान मुल लाभापासून वंचित

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : शासनाच्या योजना तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नसल्याची सातत्याने ओरड होत असते. असाच काहीसा प्रकार अंबरनाथ तहसिल कार्यालयात असलेल्या गोदामात समोर आला आहे. कुपोषीत बालकांसाठी वाटायला असलेले खजूर, काळजी वस्तूंचा संच, करोना प्रतिबंध प्रचार साहित्य आणि पुस्तकही आरोग्य विभागाच्या गोदामात धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथच्या तहसिल कार्यालयात असलेल्या या गोदामामध्ये विविध प्रकारचे साहित्य धुळखात पडून असल्याची माहिती एका स्वयंसेवकाकडे होती. त्यानुसार या गोदामाची पाहणी केली असता राज्य शासनाच्या वतीने पंचायत समितीला देण्यात येणारे लहान मुलांचे शेकडो संगोपन संच धुळखात पडून असल्याचे समोर आले आहे . यात नवजात मुलांचे कपडे, तेल, साबन आणि काळजी घेण्याचे जवळपास 22 वस्तूंचा समावेश असलेले संच अनेक महिन्यांपासून धुळखात पडून असल्याने ते खराब होण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे हे संच अद्याप का वाटप करण्यात आलेले नाही असा सवाल उपस्थित होतो आहे. त्यासोबतच कुपोषीत मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असलेले खजूर राहटोली येथील कार्यालयात पडून आहेत. त्याचे वेळीच वाटप न झाल्यास हे खजूर सडून खराब होण्याची भीती व्यक्त होते आहे.
त्यामुळे या वस्तूंचे वेळीच वाटप का करण्यात आले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. अंबरनाथ तालुक्यात सुमारे 124 अंगणवाड्या अस्तित्वात असून त्या माध्यमातून शेकडो माता, लहान मुलांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यात कुपोषीत मुलांसाठी डिसेंबर महिन्यात 1369 तर जानेवारी महिन्यात तितकेच खजुराची पाकिटे अंबरनाथ तालुक्यात आली. स्तनदा मातांसाठी असलेले लहान मुलांचे काळजी संच चक्क ऑगस्ट महिन्यात पाठवण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हे संच अंबरनाथ तालुक्यातवाटपासाठी आले. कुपोषीत मुलांसाठी ग्लुकोजची भुकटीची 600 पाकिटे जुलै महिन्यात आली होती. तर जानेवारी महिन्यात तितकीच पाकीटे अंबरनाथ कार्यालयात आली. मात्र आजतागायत त्याचे वाटप करण्यात आलेले नाही.या संबंधी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.