जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि 50 वर्षांवरील लोकांना प्राधान्य
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : जगाला तब्बल 8 महिने एका जागी खिळवून ठेवणार्या कोरोना महामारी प्रतिबंधक लस अंतिम टप्प्यात पोचली असून कोणत्याक्षणी लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारकडून होऊ शकते.
ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर देखील शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे लसीकरणाची तयारी केली जात असून लसीकरणासाठीची आढावा बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत प्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर पोलीस आणि तद्नंतर 50 वर्षावरील नागरिक तसेच को मोर्बीड रुग्णांना लसीकरण केले जाईल. 50 वर्षावरील नागरिक व को मोर्बिड रुग्णाची यादी तयार करण्याच्या, तसेच महापालिका रुग्णालये, शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचार्याच्या मदतीने लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणे शक्य नसल्यामुळे लसीकरणासाठी आवश्यक इतर कर्मचार्याचा शोध घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लसीचा आवश्यक साठा करण्यासाठी शीतगृह शोधून ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागांना देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी ठाणे जिल्ह्यात झालेल्या पहिल्या बैठकीत प्राथमिक चर्चा करत लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली असली तरी कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना यानिमित्ताने आशेचा किरण दिसू लागला आहे.
