प्रतिनिधी , पुणे : कोराना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. त्यांच्या कामामुळेच आपल्या देशात एकही भूकबळी झाला नाही. त्यांच्या कामाबद्दल ऋण व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्थानिक नगरसेवक जयंत भावे यांच्या पुढाकाराने कोरोना योद्ध्यांना समर्पित सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.”कोरोना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. अनेकांनी महिनोन्महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम केलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करणं, ऋण व्यक्त करण्याची आवश्यकता आहे.”कोरोनाच्या नऊ महिन्यांच्या काळात १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आर्थिक कोंडीनंतरही एकही भूकबळी झाला नाही. ज्या वेळी आवश्यक होतं, त्यावेळी समाजातील अनेकांनी भरभरुन मदत केली. या काळात कोव्हिड योद्ध्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार, बॅंकिंग क्षेत्रातील कर्मचारी या सर्वांमुळे समाजाचं अर्थचक्र सुरू राहिलं. त्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करतो.
