जनतेज न्युज

गर्दी टाळण्यासाठी खातेक्रमांकाच्या नंबरनुसार शेड्युल जाहीर; नागरिकांनी बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन

महिला जनधन योजनेचा लाभ थेट खात्यात

प्रतिनिधी , अमरावती : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पाचशे रूपये याप्रमाणे लाभ जमा करण्यात येत आहे. ही रक्कम नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार बँकेतून काढता येईल. मात्र, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लाभार्थ्यांना बँकेत जाऊन ठराविक तारखांनाच ही रक्कम काढावी, यासाठी लाभार्थ्यांच्या खातेक्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार (लास्ट डिजीट) शेड्युल जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार ज्यांच्या खातेक्रमांकातील शेवटचा अंक ० किंवा १ असेल त्यांनी दि. तीन एप्रिल रोजी, ज्यांचा २ किंवा ३ असेल त्यांनी दि. चार एप्रिल रोजी, ज्यांचा ४ किंवा ५ असेल त्यांनी दि. सात एप्रिल रोजी, ज्यांचा ६ किंवा ७ असेल त्यांनी दि. आठ एप्रिल रोजी, तर ज्यांचा ८ किंवा ९ असेल दि. नऊ एप्रिल रोजी रक्कम काढावी, असे कळविण्यात आले आहे. नागरिकांची गर्दी टाळणे व सुरक्षितता जपणे, हाच या शेड्युलचा हेतू आहे. दि. ९ एप्रिलनंतर कधीही ही रक्कम काढता येणार आहे. आपली रक्कम बँकेत सुरक्षित आहे.आरोग्य विभागांच्या सूचनांचे पालन होणेही आवश्यक आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी या शेड्युलचे पालन करावे, असे आवाहन इंडियन बँक असोसिएशनने केले आहे.

शक्यतो रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करावा. बँकेत व्यवहार करताना सोशल डिस्टन्स राखावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.