प्रतिनिधी, नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. कोपरखैरणे सेक्टर 17 येथे मोबाईल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. सुरक्षारक्षक झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने इमारतीत घुसून मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. कोपरखैरणे सेक्टर 17 येथील लेक व्ह्यू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून तेथील सुरक्षारक्षक पहाटेच्या वेळी झोपेत असताना अज्ञात चोरट्याने इमारतीत घुसून झोपलेल्या सुरक्षारक्षकाच्या बाजूला असलेला मोबाईल अलगद उचलून पळ काढला. इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसून आला असून पोलिस सीसीटीव्हीच्या सहाय्याने अधिक तपास करत आहेत. सुरक्षा रक्षकाचाच मोबाईल लंपास केल्याने सोसायटीतील रहिवाश्यांसह पोलिसही विचारात पडलेत. चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत असल्याने इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
