जनतेज न्युज

जयंती साजरी करताना नियमांचे पालन करा : अन्यथा कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचा इशारा.

प्रतिनिधी , सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आगामी जयंती आणि उत्सव राज्य शासनाने मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले आहे. आगामी उत्सव साजरे करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल तसेच दारू पिऊन मिरवणुकीत कोणी गैरकृत्य केल्यास त्या मंडळाच्या अध्यक्षांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना त्यांनी इशारा दिला. रमजान ईद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयातील कृष्णा हॉल येथे जिल्ह्यातील शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, अशोक वीरकर, कृष्णात पिंगळे, जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्नेहल सावंत यांच्यासह शेकडो मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या.