प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा 12 जानेवारीला मराठा सेवा संघाच्यावतीने भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असून हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून उत्कृष्ट काम करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मराठा सेवा संघाच्यावतीने मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी दिली
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये दरवर्षी 12 जानेवारीला जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल होत असतात. तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म व्यासपीठावर वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध प्रकारचे बुक स्टॉल व जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सोबतच मराठा सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. परंतु या वर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्याचा संकल्प बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्यामुळे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा भव्य स्वरूपात न करता अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.
या वर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा भव्य स्वरूपातील रद्द करण्यात आला आहे,अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली असली तरी मराठा सेवा संघाच्या वतीने कमी लोकांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून थेट लाईव्ह फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. यासोबतच कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत केली असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश तुपे यांचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहितीही लोखंडे यांनी यावेळी दिली. त्यामुळे यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा भव्य स्वरूपात न होता केवळ औपचारिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
