प्रतिनिधी, यवतमाळ : भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते. त्यापैकी तीन विद्यार्थी मायदेशी परत आले आहे.रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थी संकटात सापडले आहे. त्यांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. सात पैकी तीन विद्यार्थी दिग्रसला सुखरूप घरी परतले. त्यामुळे पालकांचा जीवही भांड्यात पडला. घरी परत आलेल्यामध्ये ऋषीकेश राठोड, प्रतिक्षा राठोड आणि हिमांशू पवार यांचा समावेश आहे. भारतात परत येत असताना या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. आताही युक्रेनमध्ये अडकून असलेल्या भारतीय मित्रांना परत आणण्यासाठी विद्यार्थ्यांकडून याचना केल्या जात आहे.
