प्रतिनिधी , ठाणे : ठाणे शहरात पाण्याच्या प्रश्न गंभीर असताना आता ठाणेकरांना १० एमएलडी वाढीव पाणी मिळावे या मुद्यावरुन महापौरांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली असतांनाच ते पाणी केवळ घोडबंदरलाच मिळणार असल्याचा दावा भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. परंतु ते पाणी एकटय़ा घोडबंदरसाठी नसून संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पाण्याच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.महापौरांच्या उपस्थितीत बल्लाळ सभागृहात स्टेमच्या अधिकाऱ्यांबरोबर ठाण्याला वाढीव १० एमएलडी पाणी मिळावे यासाठी बैठक झाली होती. त्यानंतर हे पाणी दोन ते तीन दिवसात उपलब्ध करुन द्यावे असे आदेश त्यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पुन्हा स्टेमच्या अधिकाऱ्यांनी महापौर म्हस्के यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीतही त्यांनी दोन दिवसात वाढीव पाणी उपलब्ध झाले नाही, तर मात्र जेसीबी लावून स्टेमचा सर्व कारभार खोदावे लागेल आणि पाणी खेचून आणू असा सज्जड दमच त्यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे ठाणोकरांना आता लवकरच हे वाढीव पाणी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान दुसरीकडे बैठक झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी हे वाढीव पाणी घोडबंदरला मिळणार असल्याचा दावा केला आहे. तसेच यासाठी आपणच सतत पाठपुरावा केल्याने हे पाणी आता घोडबंदरकरांना उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु आता याच मुद्यावरुन महापौर म्हस्के यांना छेडले असता केवळ घोडबंदरसाठी हे पाणी नसून ते संपूर्ण ठाणेकरांसाठी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उगाचचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी करु नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
