जनतेज न्युज

दख्खनच्या राजाला 1 टनाची महाघंटा अर्पण.

प्रतिनिधी, कोहलपुर : दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी एक टन वजनाची घंटा आज अर्पण करण्यात आली. ही घंटा पंचधातूनपासून तयार करण्यात आली आहे . ही महाघंटा आज छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते घंटानाद करून श्री जोतिबाच्या चरणी अर्पण करण्यात आली.सांगलीच्या प्रसिद्ध उद्योगपती सर्जेराव नलवडे यांनी अर्पण केलेली ही घंटा पाहाता क्षणी नजरेत भरणारी आहे. पंचधातूपासून तयार करण्यात आलेली ही घंटा तब्बल पावणे चार फूट इतकी उंच आहे. तर रुंदी 40 इंच इतकी आहे. घंटेचं वजन 1 टन आहे. ही घंटा पंचधातूची बनवण्यात आल्यामुळे याचा आवाज दूरपर्यंत भाविकांना ऐकू येईल, अशी अशी माहिती सर्जेराव नलवडे यांनी यावेळी दिली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सर्जेराव नलवडे यांचा श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.सर्जेराव नलवडे जोतिबाचे भक्त आहेत. नलवडे यांच्याकडून 2000 साली जोतिबा चरणी एक  महाघंटा अर्पण करण्यात आली होती. मात्र कालांतराने या घंटेला तडे गेले.  त्यामुळे त्यांनी नवी घंटा तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही घंटा पंचधातूची तयार करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार त्यांनी पलुस इथल्या केदार मेटल फाउंड्रीमध्ये या महाघंटेची निर्मिती करण्यात आली आहे.आज जोतिबा डोंगरावरील देवबावी तलावाच्या पश्चिम बाजुला ही घंटा विधिवत पूजा करून बसवण्यात अली. यावेळी छत्रपती शाहू महाराज, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे, सरपंच सौ. राधा बुणे, मानाचे गावकर प्रतिनिधी शंकर दादर्णे, देवस्थान समितीचे व्यवस्थापक दिपक म्हेत्तर, कोडोली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, ग्रामस्थ, सर्व मानाचे गावकरी आणि भाविक उपस्थित होते.