प्रतिनिधी , पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या बघितली तर सर्वात जास्त रुग्ण हे पुणे जिल्ह्यातून पुढे येत आहे. त्यामुळे सरकारच पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. प्रशासन २४ तास लक्ष घालून आहे. मात्र असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः किती सजग आहेत याची प्रचिती रविवारी दिसून आली. पुण्यातील एका छोट्याशा गावातील सरपंचाच्या कामाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावचे प्रथम नागरिक दत्ता गांजळे यांना राज्याच्या प्रमुखांनी फोन केल्यानंतर अक्षरशः गहिवरुन आले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जास्तीत जास्त सहभाग घेता यावा, म्हणून सरपंच दत्ता गांजळेमागील २८ दिवसांपासून आपले घर सोडून ग्रामपंचायतीमध्ये राहत आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला त्यावेळी आई वडिलांनंतर कोणीतरी मायेने चौकशी केल्याचे समाधान त्यांना वाटले. राज्यात आव्हानांचा डोंगर समोर उभा असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचरसारख्या एका छोट्याशा गावच्या सरपंचाशी बोलल्याने मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेची चर्चा रंगली आहे.
