जनतेज न्युज

दर्शन बंद, संचाराबंदी , नंतर आता चंद्रभागेत देखील स्नानाला बंदी….

प्रतिनिधी , पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दशमी, एकादशी आणि व्दादशीला विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर दशमी आणि एकादशीला शहरासह 18 गावात संचाराबंदी लागू करण्यात आलीय. प्रशासनाने यापुढे जाऊन आता चंद्रभागा नदीत स्नान करण्यास देखील प्रशासनाने 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलीय.
तसेच एकादशीनानंतर महाद्वार काल्याला दहा भाविकांना परवानगी दिली आहे. तसेच देवाच्या पादुकांची मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्याची परवानगी देण्यात आलीय.
एस टी बसने आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांनी ओळखपत्र जवळ ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने
दिल्या आहेत.
दिंड्या अथवा भाविक पंढरपूर मध्ये दाखल होऊ नये यासाठी तिहेरी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंढरपूरच्या सीमेवर 13 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. चंद्रभागा नदीवर भाविकांनी स्नानासाठी येऊ नये यासाठी नदीच्या घाटावर बॅरेगेटींग करण्यात आली आहे. स्थानिकांनी संचारबंदच्या काळात बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केलंय.