प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : एकीकडे ‘जागतिक दिव्यांग दिन’ नुकताच साजरा झाला असतानाच कल्याणच्या पोलिसांनी एका दिव्यांग बाईक चोराला अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात गेस्ट हाऊसच्या गल्लीमध्ये एक वेगळ्या क्रमांकाची नंबर प्लेट असणारी ड्युओ गाडी आढळली. ही गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला गस्तीवर असणाऱ्या पोलीसांनी थांबवून चौकशी केली असता त्याने विचित्रपणे वागण्यास सुरुवात केली. गाडीच्या नंबर प्लेटबाबत पोलिसांनी विचारणा केली असता गाडीच्या हँडलवर डोकं आपटणे सुरू केल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिपक सरोदे यांनी दिली. यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर मग त्याने चोरीची गाडी असल्याची कबुली दिल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे या चोरट्याचा डावा हात अधू असूनही तो बाईकची चोरी करत होता. आतापर्यंत त्याच्याकडून 2 चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या असून हा दिव्यांग चोरटा केवळ ड्युओ बाईकचीच चोरी करत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत.
