जनतेज न्युज

धुळे जिल्हा वकील संघ मनपा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक

प्रतिनिधी, धुळे : धुळेकरांनी मोठ्या उमेदीने भारतीय जनता पक्षाकडे धुळे महापालिकेची सत्ता दिली. परंतु, जनतेच्या कसोटीवर सत्ताधारी भाजपा सपशेल नापास झाले. ‘आम्हाला तोंड दाखवायला लाज वाटते’, अशी प्रतिक्रिया अनेकवेळा नगरसेवक बोलून जातात, तेव्हा बिघडलेल्या स्थितीचा अंदाज येतो. धुळ्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत, एका दिवसाआड पाणी देण्याच्या वल्गना करणारे दहा ते बारा दिवसांनंतर पाणी देत आहे. भ्रष्टाचाराचे असंख्य किस्से धुळे मनपातील भाजपाचेच नगरसेवक चव्हाट्यावर आणतात. धुळे शहरात नागरी समस्येचे तीन तेरा वाजलेले असताना सर्व बाजूंनी मनपावर जोरदार टीका होत आहे, तरीही निगरगट्ट महानगर पालिका प्रशासन आणि भाजपाच्या सत्ताधाऱ्यांना फरक पडला नाही. मात्र आता धुळे मनपा प्रशासानाच्या विरोधात धुळे वकील संघाने इंगा दाखवून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देताच धुळे महानगर पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे.धुळे शहरातील नागरीकांना नियमित पाणी पुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छता, पथदिवे, हॉकर्स झोन अशा मुलभुत सुविधा देण्यात अपयशी ठरत असलेल्या धुळे महापालिकेच्या विरुध्द धुळे जिल्हा वकील संघ आक्रमक झाला आहे. वकील संघाने महापालिकेविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची भुमिका घेत आज लाल फिती लावून निषेध केला. येत्या 45 दिवसांच्या आत मनपाकडून जनतेचे हक्काचे प्रश्न सोडवले गेले नाही तर गुन्हा दाखल करण्याची कारवाईचा इशारा आज वकील संघाच्या वतीने देण्यात आला आहे. वकील संघाने घेतलेल्या या भूमिकेचे समर्थन धुळे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले व त्यांच्या या भूमिकेला आपला पाठिंबा आहे असे देखील जाहीर करण्यात आले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. डी. जोशी यांनी सांगितले की, धुळे महापालिकेने नागरीकांना पाणी, रस्ते, स्वच्छता, पथदिवे, उद्याने, हॉकर्स झोन या सुविधा देणे आवश्यक असतांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने जनतेचे हाल सुरु आहेत. जनतेशी असलेली आमची सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि आहे. समाजातील एक जागृक घटक म्हणून आम्ही याविरुध्द आक्रमक होत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मनपा जर लोकांना सुविधा देणार नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठीच धुळे जिल्हा वकील संघाने मनपाला इशारा दिला आहे.