जनतेज न्युज

धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्याजरी कमी असली, तरी गाफील राहू नका; जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन.

प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी आरोग्य यंत्रणेने तसेच धुळेकर नागरिकांनी गाफिल राहू नये. आरोग्य विभागाने सतर्क राहत चाचण्यांची संख्या वाढवावी. मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
दिवाळी सणामुळे बाजारपेठेतील वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत व्यापारी प्रतिष्ठाने, नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दिवाळी आपल्यासाठी मोठा सण जरी असला तरी यंदाची दिवाळी ही अगदी साध्या पद्धतीने साजरी करा. तसेच लहान बालके असतील वृद्ध माणसे असतील यांच्या आरोग्याची काळजी घेत ह्या दिवाळीत फटाक्यांचा कमी वापर करावा तसेच प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.
शासनाने घालून दिलेल्या या नियमांचे पालन करण्यासाठी धुळेकर नागरिकांना प्रवृत्त करावे. जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. माझे कुटुंब- माझी जबाबदारी या मोहिमेची माहिती अद्ययावत करावी. आरोग्य यंत्रणेने या मोहिमेत आढळून आलेल्या को-मॉर्बिड रुग्णांच्या संपर्कात राहावे. नागरिकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असेही आवाहन या यावेळी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली.