जनतेज न्युज

नंदुरबार शहरातील शिक्षक शेतकर्‍याचा घरातून चोरट्यानी लांबविला 60 हजाराचा कापूस…

प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार शहराजवळ असलेल्या मेघमल्हार सिटीत राहणारे शिक्षक शेतकर्‍याचा घरातून आज पहाटेच्या सुमारास जवळपास 60 हजार रूपये किंमतीचा कापूस अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात भुरटे चोर व गुंडांनी धुमाकुळ घातला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने चोरीचे गांभिर्य लक्षात घेवून अज्ञातां विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मेघमल्हार सिटीत राहणारे शिक्षक महेंद्र ताराचंद शिरसाठ यांनी कार्ली शिवारात शेती केली आहे. त्या शेतातून त्यांना साडे बारा क्विंटल कापूस पिकविला होता. त्यांनी तो कापूस मेघमल्हार सिटी मधील गिरीष दिक्षीत यांच्या रिकाम्या घरात साठवूण ठेवला होता. दरम्यान दि.2 नोव्हेंबरच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी हा कापूस लंपास केल्याचे निर्दशनास आले. त्याकापसाची किंमत सुमारे 60 हजार रूपये इतकी आहे. चोरांनी घराच्या मागील भागातील खिडक्यांचे ग्रील तोडून कापूस लंपास केल्याचे लक्षात आले. याबाबत महेंद्र शिरसाठ यांनी नंदुरबार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला आहे. या परिसरात चोरटे व गुंडांनी धुमाकुळ घातला असून गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वी याच परिसरात लागुन असलेल्या कॉलनीत गुंडांनी घर जाळण्याचा प्रयत्न केला आला होता. सुदैवाने यात जीवीत टळली होती. याप्रकरणी पोलिसांनी या चोरटे व गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाश्यांकडून जोर धरू लागली, बंदोबस्त न झाल्यास येथील रहिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत अशी चर्चा नागरिकांमधून होवू लागली आहे.