उद्या सकाळपासून रेल्वे तिकीट काउंटर शेजारी महापालिकेचे स्टोल्स राहणार तैनात
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकासाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकल मधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसाचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशाचे करोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असून उद्या बुधवार सकाळपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकात प्रवाशासाठी स्टोल सुरु केले जाणार आहेत.
रेल्वे पास देण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 6 रेल्वे स्टेशन असून
कल्याण ,डोंबिवली ,कोपर,ठाकुर्ली ,शहाड ,आंबिवली ,टिटवाळा या रेल्वे स्थानकावर तिकीट काउंटर शेजारीच महापालिकेकडून स्टोल्स उभारण्यात येणार असून उद्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्टोल्स सुरू राहणार आहेत
ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल,
मदत कक्षावरील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर शिक्का मारण्यात येईल.
सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही १५ ऑगस्ट २०२१ पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.
