प्रतिनिधी, औरंगाबाद : राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास 600 दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या सदस्यासह कोविड लस घेणे आवश्यक आहे. तसा पुरावा सोबत ठेवण्यासह ओळखपत्र सोबत ठेवावे, अशी विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व भाविकांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नाथ षष्ठी निमित्त 20 ते 25 मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये 20 व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार करावी. याशिवाय 10 व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या. पैठणमध्ये भाविक दाखल होण्यास सुरूवात होत असल्याने पाटबंधारे विभागाने 20 ते 25 मार्च या कालावधीत गोदावरी नदीपात्रात 1.00 Mcum पाणी सोडण्यास सुरूवात करावी. यासाह पोलिस यंत्रणांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा. वीज विभागाने लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक त्याठिकाणी जनित्रांची व्यवस्था करावी. नगर पालिका प्रशासनाने आवश्यक त्या कामांसह स्वच्छतेवर भर द्यावा. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या साधनसामुग्रीसह पथके तयार ठेवावीत, आरोग्य यंत्रणांनी मुबलक औषध साठ्यांसह आरोग्य पथके नेमावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
