प्रतिनिधी , जळगाव : टाळेबंदीत रोजीरोटी थांबणार असल्याने राज्य शासनाने काही घटकांना आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र, सलून व्यावसायिकांच्या बाबतीत सापत्न भूमिका घेतली. या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी भडगाव शहरातील नाभिक समाज बांधवांनी मुंडन आंदोलन करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नाभिक समाज बांधवांनी शहराजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात सकाळी ९ वाजता मुंडन केले. यावेळी अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. भडगाव तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
व्यवसाय बंद असल्याने खचून जात अनेक समाजबांधवांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या. याचा विचार शासनाने करायला हवा होता. नाभिक समाजाला मदत न देणे हा नाभिक समाजावर अन्याय आहे. नाभिक समाजाने किती अन्याय सहन करायचा? असा सवाल भडगावच्या नाभिक समाज विकास मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
