प्रतिनिधी , जळगाव : पिस्तूलाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची बॅग चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. घटनेवेळी आरोपींची दुचाकी आणि पिस्तूलची मॅगझीन घटनास्थळी पडली होती. दुचाकीच्या चेसिस नंबरवरून चोरट्यांची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस करत उल्हासनगरातून त्यांच्या मुसक्या आवळल्या.स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने या दोघांच्या उल्हासनगरातून मुसक्या आवळल्या. दोघांच्या ताब्यातून 9 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. मनोज मोकळ आणि राजेंद्र राजपूत अशी दोन्ही चोरट्यांची नावे असून ते धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवासी आहेत.
जळगाव शहरातील एमआयडीसीतील प्रभा पॉलिमर कंपनीचे कर्मचारी महेश भावसार व संजय विभांडीक हे 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता 15 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन गणपतीनगरकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी भावसार यांच्याकडे रोकड असलेली बॅग होती. तर विभांडीक हे दुसऱ्या दुचाकीवर होते. पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आल्यानंतर संशयित आरोपी मनोज व राजेंद्र हे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांच्या मागून आले. त्यांनी भावसार व विभांडीक यांच्या दुचाकी अडवत पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. झटापटीत पिस्तूल रोखून पैशांची बॅग चोरून पळ काढला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चोरट्यांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली होती.
