जनतेज न्युज

पर्यटकांसह भाविकांची कुंचबना, तेर येथील कोट्यावधी खर्चुन बांधलेले पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह धुळखात पडून

प्रतिनिधी , कुंचबना, तेर : देशी विदेशी पर्यटकांची व कुंभार समाजासह वारकऱ्यांचे अराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ, संतपरिक्षक गोरोबा काकांच्या भाविकांची गैर सोय दूर व्हावी म्हणून  तेर ता.उस्मानाबाद येथे पाटबंधारे विभागाचे वतीने बांधण्यात आलेले  विश्रामगृह गेली अनेक वर्षांपासून धूळखात पडले आहे.विश्रामगृहाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी नसल्याने हे विश्रामगृह बंद ठेवण्यात आले आहे.  येणाऱ्या पर्यटकांसह भाविकांची कुंचबना होत असून पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या विश्रामगृहाची अवस्था बकाल झाली आहे.
पर्यटकांची गरज ओळखून तत्कालीन पाटबंधारे मंत्री माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी 1993 मध्ये पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह बांधले होते. परंतु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची अवस्था  दयनीय झाली आहे. पर्यटकांची सोय व्हावी म्हणून लाखो रूपये खर्चून उभारलेली इमारत सध्या धूळखात पडून आहे. पर्यटकांसाठी विश्रामगृहात 2 सूट 1 व्ही.आय.पी.वातानुकूलित सूट,1 मिटिंगहाँल  1 डायनिंग हाँल वायरलेस यंत्रणा अशा सुविधा असलेली विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली. त्याप्रमाणे सुरूवातीला विश्रामगृहाची देखभाल चांगल्या पद्धतीने ठेवली गेली होती.त्या नंतरच्या काळात पाटबंधारे विभागाकडे कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने इमारतीस अवकळा आली.गेल्या अनेक वर्षे पासून इमारतीच्या आतील शौचालय नादुरुस्तच आहेत. परिसरातील सुशोभित झाडे वाळली आहेत. विश्रामगृहामधील विद्यूतीकरणाची पुरती वाट लागली आहे. इमारतीची देखभाल करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने परीसरात जनावराचा मुक्त संचार आहे. हे विश्रामगृह प्रमुख व्यक्तीच्या विश्रामासाठी आहे की जनावरांच्या विश्रामासाठी आहे. असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे. याठिकाणी देश विदेशातून पर्यटक, इतिहास संशोधक , भाविकभक्त येते असतात. विश्रामगृह बंद असल्याने त्यांना उस्मानाबाद शहराचा आधार घ्यावा लागतो त्यासाठी विश्रामगृह सोयी सुविधा सह चालू करणे आवश्यक आहे. 
इमारतीची शोभा वाढविण्यासाठी इमारतीच्या समोर व मोकळ्या जागेत फुलझाडे लावली होती ती वाळून गेली आहेत.