प्रतिनिधी , पुणे विभागात कोरोना बाधित एकूण ५१८ रुग्ण
पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१८ झाली आहे. तथापि ॲक्टिव रुग्ण ४०४ आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात आतापर्यंत एकूण ५१८ कोरोना बाधित रुग्ण असून एकूण ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात ४६३ बाधित रुग्ण त्यापैकी ४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात ११ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला असून एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. ८ ॲक्टिव रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात १२ बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ११ ॲक्टिव रुग्ण आहेत. सांगली जिल्ह्यात २६ रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी २५ रुग्णांला घरी सोडण्यात आले आहे. तसेच १ ॲक्टिव रुग्ण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६ बाधित रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण ६ हजार ७८१ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी ६ हजार ३८३ चा अहवाल प्राप्त आहे. तर ३९८ नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ५ हजार ८४६ नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून ५१८ नमुन्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकून १२० फ्ल्यू क्लिनिक स्थापन करण्यात आले असून त्यापैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात ७३ क्लिनिक आहेत तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ४७ क्लिनिक आहेत. नागरिकांनी ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ फ्ल्यू क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
आजपर्यंत विभागामधील ३५ लाख ५९ हजार ९९२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १ कोटी ३६ लाख ५४ हजार २४८ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ७९४ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
विभागात एकूण ५ हजार ९७१ नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात ४ हजार ११, सातारा जिल्ह्यात ३२५, सोलापूर जिल्ह्यात ७४४, सांगली जिल्ह्यात ८८८ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
विभागात एकूण १ हजार ९६९ नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात २०४, सातारा जिल्ह्यात ११६, सोलापूर जिल्ह्यात ४२१, सांगली जिल्ह्यात ६२ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ११६६ नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा
पुणे येथील मार्केटमध्ये विभागात ३२ हजार ६७५ क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक ७ हजार ३३ क्विंटल, फळांची २ हजार ११८ क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची १५ हजार ५१० क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात १५ एप्रिल रोजी ९९.२८३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २२.७८६ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.
विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत १३९ व साखर कारखान्यामार्फत १ हजार ११२ असे एकुण १ हजार २५१ रिलीफ कॅम्प स्थलांतरित मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण १ लाख २७ हजार ३६ स्थलांतरित मजूर असून एकुण १ लाख ९९ हजार २९५ मजूरांना भोजन देण्यात येत आहे, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
