जनतेज न्युज

पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग, 25 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

प्रतिनिधी , पुणे : पुण्याच्या कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत या मार्केट मधील पंचवीस दुकाने जळून भस्मसात झाली आहे. त्यानंतर तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की पुण्यातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केट आहे. या मार्केटमध्ये मटण आणि चिकनची दुकाने आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या मार्केटमध्ये एका दुकानात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मार्केटला भीषण आग लागली. या आगीत तब्बल पंचवीस दुकाने जळून भस्मसात झाली आहे. दुकानात असणाऱ्या कोंबड्या आणि बकऱ्या देखिला आगीत जळाल्या आहेत.

दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले