प्रतिनिधी, सांगली : जिल्हा पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरु आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी लूट सुरू आहे, अनेक कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अनेक श्रीमंतांना धान्य मिळते, मात्र गरजूंना मिळत नाही. सर्व गरीब रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे या मागनिसह पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग मधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पात्र रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणे बंद झाले आहे. जुनी रेशन कार्ड नवीन करून तातडीने दिले जात नाही. नवीन रेशन कार्डही लवकर मिळत नाहीत. रेशन कार्ड काढण्यासाठी दलालाची साखळी आहे. दलाल मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांची लूट करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जर लवकरात लवकर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
