प्रतिनिधी, रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागात मागच्या २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून तो मार्गी लागावा तसेच हेटवणे कालव्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणी करिता खारेपाट विभागातील महिलांनी मूलभूत हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून पेण प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी महिलांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपूर्ण पेण मधून मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला आंदोलक आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. “यावेळी महिलांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला, धरण आहे उशाला, कोरड आमच्या घशाला, आवाज कुणाचा सावित्रीच्या लेकींचा, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आम्ही सावित्रीच्या लेकीं, पाण्यासाठी आमची एकी या घोषणा देण्यात आल्या.
