प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : एक कॅमेरा देशासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी ही संकल्पना राबवत शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तींनी मागील तीन महिन्यात ३००० हून अधिक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डोंबिवली विष्णुनगर पोलिस ठाणे व भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या वतीने शहरातील सोसायट्यांना १००० सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे यांच्या हस्ते नागरिकांनी सुरक्षेसाठी तिसऱ्या डोळ्याची मदत स्वीकारली. शहरातील गुन्हेगारी वाढत असतानाच या गुन्ह्याची उकल कमीत कमी कालावधीत करणे सीसीटीव्ही कॅमेर्याच्या मदतीने करणे तसेच खऱ्या गुन्हेगाराला अटक करणे पोलिसाना शक्य होत आहे. साहजिकच शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरा महत्वाची भूमिका बजावत आहेत . मात्र अनेक ठिकाणी दुकानाबाहेर, सोसायट्यामध्ये तसेच गल्लीबोळात सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसाच्या तपासाला अडथळे येतात. गुन्हेगारावर वचक बसवून त्यांच्यात भीती निर्माण करत त्यांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी एक कॅमेरा देशासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी या संकल्पनेअंतर्गत शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केलं होत .आता पर्यंत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात ३००० कॅमेरे लावण्यात आले आहेत . भाजप नगरसेवक विकास म्हात्रे ,कविता म्हात्रे व डोंबिवली विष्णू नगर पोलिस ठाण्याच्या वतीने डोंबिवली शहरातील विविध सोसायट्याना एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे वाटण्यात आले .यावेळी डोंबिवलीचे एसीपी जे डी मोरे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरा महत्वाची भूमिका बजावत असल्याने या कॅमेऱ्याचे महत्व वाढल्याचे नमूद केले.
