जनतेज न्युज

बार्शीत ‘भाभी गँग’ पोलिसांच्या हाती

प्रतिनिधी , सोलापूर : दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी असताना नागरिकांचे मोबाईल लंपास करणार्या भाभी गॅग टोळीला बार्शी पोलिसांनी भाजी मंडईजवळ रंगेहाथ पकडले. एका महिलेसह तिघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता, न्यायदंडाधिकारी श्री. धडके यांनी त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, आज पुन्हा पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
अहमद नजीर शेख, सलीम हसन शेख व शाहिदा अब्दुल शेख (सर्व रा. आकुलगाव, ता. माढा) अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान मुख्य बाजारपेठेत घडली. बाजारपेठेतील वाहनांची गर्दी तसेच जनतेच्या मालमत्तेच्या संरक्षणाच्या दृष्टीने दिवाळी सणानिमित्त मागील आठ ते दहा दिवसांपासून सतर्क राहून चोरी होऊ न देण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार शहरात पोलिस गस्त घालत असताना हे तिघेजण संशयास्पद वावरताना दिसले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून माहिती घेतली असता त्यांच्याकडे सात मोबाईल व एक चारचाकी वाहन असा ६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांना मिळून आला.
संशयित आरोपी भाभी गॅगच्या नावाने प्रसिद्ध असून सांगली,
सातारा, सोलापूर येथील वेगवेगळ्या शहरांतील आठवडा बाजार तसेच गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल हँडसेट तसेच दागिन्यांची चोरी करत असल्याबाबत माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. या तपासात पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून पुढील तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. सदर गुन्ह्याचा गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार गणेश दळवी हे करीत आहेत.